एक बशी
एक साधाच प्रसंग डोळ्यासमोर घडला आणि हे विचारचक्र सुरु झाले. एका कार्यक्रमाला गेले होते. जेवताना माझ्या जवळ एक लहान मुलगी, तिचे वडील आणि आई असे बसले होते. घडलं असं, की त्या मुलीच्या आईने त्या मुलीला अमुक एक पदार्थ हवाय का? असं म्हणत स्वतःच्या ताटातील तो पदार्थ तिला देऊ केला. यावर त्या मुलीने आईला विचारलं, की तुला नकोय का? मी चमकून तिच्याकडे बघितलं. इतकी छोटीशी मुलगी हिने असं का बरं विचारलं असेल? म्हणजे आईला नकोय म्हणून तीने आपल्याला देऊ केला असं वाटलं का त्या मुलीला….
आणि तसंच असेल तर….
तसंच द्यायचं असतं तर तिने तसं म्हटलं असतं ना, मला नकोय तू घे म्हणून…
नाही का!
इथून जे काही विचार सुरू झाले ते ह्या पोस्टवर येऊन थांबले .
कशी गम्मत आहे ना….स्वतःला नको असलेली गोष्ट सहज देता येते इतरांना. पण स्वतःला हवी असते तरीही त्यातला थोडा हिस्सा द्यायला कितीजणं आनंदाने तयार होतील….
आणि ह्या सगळ्या विचारात एक प्रसंग आठवला हा प्रसंग म्हणजे कधीतरी एकदाच घडला असं नाही बरं, हे रोजचंच होतं. माझ्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी मी माझ्या आजोळी राहिले होते. माझ्या आजोबांचं आणि माझं खूपच चांगलं ट्युनिंग होतं. जेव्हा कधीही ते चहा पीत असायचे, आणि तेव्हा मी तिथे आले की त्यातली एक बशी ते नेहमीच मला द्यायचे. ते म्हणतं की ‘एक बशी आण’ त्यांच्या प्रत्येक चहातली एक बशी माझी. अर्थातच चहा करताना मी तिथे नसायचे त्यामुळे माझ्यासाठी चहा केलेला नसायचा. पण त्यांच्या चहातील एक बशी मात्र माझी असायची…. त्यांना तर चहा अतिशय प्रिय होता. दिवसातून कितीही वेळा चहा चालायचा त्यांना. इतक्या प्रिय चहातील एक बशी माझी असायची म्हणजे अर्थात त्यांची प्रिय ‘मी’ होते चहापेक्षाही…..
कळलंच की मग सगळं…
मला तर माझी बशी मिळाली, आता विचार करायचा आहे की मी कुणासाठी तरी ‘ती एक बशी’ असू शकते का…….
अरुंधती
No comments:
Post a Comment